पुणे : बेकायदा सावकारी करून व्याज रोख रकमेत वसूल करूनही ८ गुंठे जागा शिवीगाळ आणि दमदाटी करून जबरदस्तीने मुलीच्या आणि मुलाच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश नानासाहेब गायकवाड यांना एस. व्ही. निमसे कोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वप्निल गणपतराव बालवडकर (वय ३६, क्लोरोस रेसिडन्सी बालेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि गणेश नानासाहेब गायकवाड यांच्यासह राजू दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (वय ५२, सर्वोदय रेसिडन्सी पिंपळेनिलख) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गायकवाड बापलेकांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, गायकवाड बापलेक बेकायदा सावकारी करतात. या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा मालमत्ता जमवली आहे. ते सावकारी स्वरूपात पैसे देताना अकाऊंटवर पैसे देऊन व्याज रोख स्वरूपात वसूल करतात, तर दिलेली रक्कम अकाऊंटवर तेवढीच परत घेतात असे फिर्यादी आणि साक्षीदार सांगत आहेत. त्याबाबत तपास करायचा आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मोक्का कायद्यांतर्गत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल असून, त्याचा तपास सुरू आहे. आरोपींनी इतर गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी केला.