पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील नंदिणी या वाघीणीचा गुरूवारी संध्याकाळी वृध्दापकाळाने मृत्यू झाला आहे. सोळा वर्षांपूर्वी पुुणे महापालिकेच्या पेशवे उद्यानात नंदिणीचा जन्म झाला होता.
पेशवे पार्क कात्रजला स्थलांतरीत झाल्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या निसर्गरम्य वातावरणात नंदिणी तेरा वर्षे निरोगी आयुष्य जगली. पिवळा पट्टेरी बंगाली वाघ या कुळातील नंदिणीची गेली तीन वर्षे वृध्दापकाळाने हालचाल मंदावली होती. संधिवात आणि स्नायुदुखीमुळे आजारी असल्याने गेले काही काळ नंदिनी ला व्याघ्र प्रदर्शनात सोडले जात नव्हते. तिच्या पायात व्यंग निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तिला चालताही येत नव्हते ती एका जागी बसली होती. नंतर पंधरा दिवसांपासून जमिनीशी खिळून होती. अन्नपाणी सोडून दिल्यामुळे तीला सलाईन देण्यात येत होतं. दरम्यान प्राणिसंग्रहालय प्रशासनाने तिच्यावर उपचाराची शिकस्त केली होती. नंदिणीसह प्राणिसंग्रहालयात नऊ वाघ होते ती संख्या आता आठ झाली आहे.
सर्वसाधारणपणे वाघाचे आयुर्मान १५ वर्षांचे असते. मात्र नंदिनी मानवी देखरेखीखाली असल्याने साडेसोळा वर्षांपर्यंत जगली असे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले.