डंपरच्या अनिर्बंध वाहतुकीचा दुष्परीणाम; विद्यार्थ्यांचेही नुकसान
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दगडखाणीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे पीएमआरडीएने तयार केलेला मुख्य रस्ता चांगलाच खचला असून तो धोकादायक ठरत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे.
गावातून मुख्य रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून जलदगतीने नुकतेच केले. मात्र दररोज हजारोंच्या संख्येने ओव्हरलोड अवजड वाहने या रस्त्यावरुन वेगाने जातात. त्यामुळे रस्त्याशेजारील नागरिकांना दररोज धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत असून हा रस्ता पुर्णतः खचला असुन तो असुरक्षित झाला आहे.
गावात शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहे मात्र जेव्हा शाळा सुरु होत्या तेव्हा खाणीच्या कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलेलं कळत नाही, अशी तक्रार शाळकरी विद्यार्थी करतात. गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर असून ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गावात कचरा उचलण्यासाठी यंत्रणा नसल्याने सणसवाडी परिसरात हा कचरा उघड्यावर टाकला जातो. त्याची योग्य विल्हेवाट न लावता त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होते. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा असते मात्र हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. मिळणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे आधी वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा द्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून त्यांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती आहे. महापालिका विलीनीकरणानंतर शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून गावाचा विकास व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
कोट
खाणकामामुळे घरांची पडझड झाली. आता तर बांधकामाचे आयुष्य कमी होत असून खाणकाम करणारे शासकीय नियमांची पायमल्ली करत आहेत.
-भरत कोंढाळकर,नागरिक
कोट
प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावात मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करायला हवे. अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी.
-यशवंत कोंढाळकर, नागरिक
फोटो ओळ
नांदोशी गावातील खाणकामामुळे अशा पद्धतीने डोंगर कोरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.