मंगळवारी (दि.१९) दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदनगरहून आळेफाट्याकडे जाणाऱ्या अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर यांच्या इनोव्हा गाडीचा (एम.एच.१२ जे.एम. ६५५१) जेसीबी मशीनला धडकून अपघात झाला. सुदैवाने त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष दुखापत झाली नाही, परंतु इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी आणे येथील रहिवासी रामनाथ जकाते यांच्या दुचाकीला अहमदनगरकडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली होती. त्यात जकाते यांचा दवाखान्यात नेत असतानाच मृत्यू झाला.
येथून जवळच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा नेहमीच चालू असते. यापूर्वी एका विद्यार्थ्यांचा अपघात झाला असता, ग्रामस्थांनी आंदोलन केल्यामुळे या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते, परंतु अल्पावधीतच ते गतिरोधक तुटून गेल्याने वाहने भरघाव वेगाने ये-जा करतात. ग्रामस्थांनी अनेक वेळा पक्के गतिरोधक बसविण्याची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.