मोदी माफी मागणार नाहीत; काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, गिरीश बापटांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:19 PM2022-02-18T16:19:22+5:302022-02-18T16:19:56+5:30
वक्तव्याच्या निषेधार्थ मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही काँग्रेसकडून केली जात आहे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत 'महाराष्ट्र काँग्रेसने देशात कोरोना पसरवला' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले. वक्तव्याच्या निषेधार्थ मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही काँग्रेसकडून केली गेली. त्याच वक्तव्याच्या निषेधार्थ अजूनही ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. आजही पुण्यात चक्क खासदार गिरीष बापट यांच्या घरासमोर पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यांनतर गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं वाटत असेल. तर ते कधीच माफी मागणार नाहीत. काँग्रेसनेच देशाची माफी मागावी. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
बापट म्हणाले, काँग्रेस आज माझ्या घरासमोर निदर्शन केली. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं वाटत असेल. तर ते कधीच माफी मागणार नाहीत. कारण कोरोना काळात जो पक्ष आणि राज्य जे राजकारण खेळलं ते निंदनीय आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिली. ट्रेन सोडल्या लसीकरण केलं. पण ज्या पद्धतीत काँग्रेसने मुंबई मध्ये कामगारांच्या मनात भीती बसवली. त्यांना रेल्वे स्टेशन वर एकत्र केलं आणि कोरोना पसरवला. म्हणून काँग्रेसनेच देशाची माफी मागावी. आता भारताची जी प्रगती होत आहे. ती मागच्या 70 वर्षात कधी झाली नाही. म्हणून काँग्रेसने मोदीजींचे आभार मानले पाहिजे.
भ्रष्टाचारी लोकांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही
किरीट सोमय्या सत्काराच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारात गोंधळ घातला. त्यावेळी पुणे पोलिसांनाही त्यांना शांत करता आलं नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडून भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर बोलताना बापट म्हणाले, भाजपचे 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. कारण हे आमचं व्यक्तिगत काम नाही. आम्ही समाजासाठी काम करत असतो. भाजप कोरोनाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काम करता आहे. त्या लोकांना आम्ही आत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही बापट यांनी यावेळी दिला आहे.