हवेली पंचायत समिती उपाध्यक्षपदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते. पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेना तसेच कॉंग्रेसने पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला सभापतिपदाचा बहुमान मिळाला होता. महाविकास आघाडीच्या या विश्वासावरच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपसभापतिपद शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, याबाबत एकमत झाले. याकरिता शिवसेनेकडून वाघोली-आव्हाळवाडी गणातील नारायण आव्हाळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. आमच्या या निर्णयाला आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही उचलून धरले. आव्हाळे यांनी उपसभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. एकमेव अर्ज आल्याने अर्ज छाननीनंतर अर्ज मंजूर करीत शिवसेनेचे आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, हवेली शिवसेना प्रमख प्रशांत काळभोर यांचेही योगदान असल्याचे कटके यांनी सांगितले.
विजयी उपसभापती नारायण आव्हाळे व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके आदी.