खोडद : एसटी बसचे स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला ओढ्यात जाऊन पुलाच्या कठड्याला धडकून थांबली. या अपघातात बसमधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी १२ च्या सुमारास नारायणगाव-खोडद रस्त्यावरील हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोरमळा येथे घडली.याबबत माहिती अशी : मंगळवारी सकाळी १०.३० वाजता नारायणगाव एसटी आगारातून नारायणगाव-खोडद (एमएच १४ बीटी ०३५७) ही एसटी बस सोडण्यात आली. खोडदवरून नारायणगावकडे परत येताना हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोरमळा येथे सुमारे १२ च्या सुमारास आल्यानंतर, एसटी बसचे स्टेअरिंग फेल झाल्यामुळे चालक बाळू सूर्यवंशी यांचे बसवरील नियंत्रण सुटले व एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात घुसली. या ओढ्यावर असणाऱ्या पुलाच्या कठड्याला ही बस धडकल्याने बस अडकून राहिली. या अपघातात एसटी बसची पुढील काच पूर्णपणे निखळून पडली, तर एक टायर फुटला आहे. या वेळी बसमध्ये १३ प्रवासी होते. यातील एक प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक दिलीप शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना नारायणगावला आणले.
नारायणगाव-खोडद एसटी बसचा अपघात
By admin | Published: March 22, 2017 3:01 AM