पुणे : मणिपूर मधल्या आपल्या भगिनींची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या वडील आणि भावाला मारून टाकण्यात आले. तरीही त्यावर काही बोलण्यासाठी पंतप्रधान यांना वेळ नाही. स्वतःच्याच 'मन की बात' ऐकवणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना वेळ नाही. टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते उद्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात येत आहेत. त्यांच्याविरोधात महत्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर सकाळी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा काळे झेंडेही दाखविणार आहेत.
हा निषेध कॉग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने होत आहे. मणिपूरच्या घटनेविषयी तुम्ही अस्वस्थ आहात का? आपल्या देशातल्या एका भागामध्ये सुरू असलेल्या या वंशसंहाराच्या घटनांबद्दल तुम्हाला चिंता वाटते का? एकूणच देशातील केंद्र सरकारच्या कारभारामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय झाले आहे. याविषयी आपली तगमग होत आहे का? जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आता शांत बसून चालणार नाही.
लोकशाहीमध्ये सनदशीर शांततेच्या मार्गाने उद्या निषेध व्यक्त होणार आहे. उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात विविध कार्यक्रम आहेत. त्यांना जनतेच्या मनातील भावना कळवण्यासाठी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे निषेध निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत. भारतीय नागरिक म्हणून यात सहभागी व्हा आणि आपला निषेध नोंदवा, असे आवाहन सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.