पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. कोरोनामुळे आधीच विविध आघात सहन करीत असलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून विश्वासघातच पदरी पडला आहे. अशी टीका पुण्यातून राष्ट्रवादीने केली आहे.
या अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. देशातील मध्यमवर्गीयांची वाढती संख्या पाहता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून या अपेक्षाची पूर्तता व्हायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. करामधील स्लॅब हा पाच-सात वर्षांपूर्वी निश्चित झालेला आहे. या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच कोरोनामुळे सामान्य जनतेचे आणि विविध क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत दिलासा देणे हे सरकारचे काम असताना, जनतेशी काहीही देणेघेणे नसलेल्या सरकारने त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
अर्थसंकल्प नक्की कुणासाठी मांडला
''गरीब जनता, नोकरदार, मध्यमवर्गीय, शेतकरी, तरुण, कामगार आणि महिला अशा सर्वच घटकांची या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. केंद्रातील सरकारची वाटचाल ही दिशाहीन असून, हा अर्थसंकल्पही असाच दिशाहीन आणि भरकटलेला आहे. त्यामुळे, सरकारने हा अर्थसंकल्प नक्की कुणासाठी मांडला आहे असा प्रश्न राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला आहे.''