पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं बोलायला पाहिजे तेव्हाच गप्प बसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग फार बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची. परंतु, आतादेखील नेमकं बोलायला पाहिजे तेव्हाच पंतप्रधान मोदी गप्प बसतात, अशी टीका पवारांनी केली. यावेळी त्यांनी कथुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणावरूनही भाजपाला धारेवर धरले. भाजपाच्या नेत्यांच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. आरोपींना वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यांमध्ये भाजपाचे मंत्री सामील होतात. देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतके नादान राज्यकर्ते मी पाहिले नाहीत, असे पवार यांनी सांगितले. तसेच पवार यांनी आगामी निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेसलाही इशारा दिला. आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहोत. मात्र, त्यांनी काय ते सरळ सांगावं, रडीचा डाव आम्हाला पसंत नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालांचाही उल्लेख केला. निवडणुका जवळ आल्या आहेत. लवकर निर्णय घेऊन निवडणुका घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, उत्तर प्रदेशाच्या जनतेचे अभार मानायला हवेत. देशातील 7 ते 8 निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष हरला. कोणत्याही सत्ताधारी पक्षाला असे अपयश यापूर्वी आले नव्हते, असे पवारांनी सांगितले.
नेमकं बोलायला पाहिजे तेव्हाच मोदी गप्प बसतात; शरद पवारांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:49 PM