पुणे : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून राज्यातील कानाकोपऱ्यात नरेंद्र मोदींचा निषेध केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँगेसने त्या विधानविरोधात काल आंदोलन केले होते. आज शहर काँग्रेसने त्या विधानाविरोधात पुणे महापालिकेसमोरील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. 'शर्म करो शर्म करो मोदीजी शर्म करो' अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
''छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीबद्दल असं विधान कारण मोदींना शोभत नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना एखाद्या राज्याबद्दल वाईट बोलण्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी असे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले आहे.''
संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्याच्या विरोधातील आंदोलन काल ऐनवेळी रद्द करण्याच्या शहर काँग्रेसच्या निर्णयावर कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांच्यातील काहींनी पक्ष महत्वाचा की प्रभागांवरील हरकती असा प्रश्न करत प्रदेशाध्यक्षांच्या आदेशालाही डावलण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले.