पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi in pune) यांच्याहस्ते रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन (pune metro) होत आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर कर्वे रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस खात्याने संबधित दुकान मालकांना बजावल्या आहेत. रहिवासी इमारतींचे दरवाजेही बंद ठेवण्यास कळविण्यात आले आहे. सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आपल्या इमारतीमधील रहिवाशांची माहिती पोलीस ठाण्यात देण्याबाबतही सांगण्यात आले आहे.
मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानकापासून मोदी प्रवास करणार आहेत. आनंदनगर स्थानकापर्यंत ते मेट्रोतून जाणार आहेत. रस्त्यावर त्यांचा संबंध येणार नाही, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव डेक्कन पोलिसांनी कर्वे रस्ता व त्यापुढे आनंदनगरपर्यंतच्या रस्त्यावरील सर्व दुकाने रविवारी दिवसभर बंद ठेवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. एकही व्यापारी आस्थापना त्यादिवशी दिवसभर खुली करणार नाही.
अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पोलिसांना असलेल्या अधिकाराअंतर्गत ही नोटीस देण्यात आली आहे. त्यादिवशी दुकान बंद ठेवावे. रहिवासी इमारतीमध्ये वा दुकानांमध्ये नेहमीच्या व्यक्तींशिवाय आंगतूक, अनोळखी व्यक्ती येणार नाही याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. आपल्या दुकानांचे, इमारतींचे सुरक्षा रक्षक असतील तर त्यांना या दौऱ्याबाबत सतर्क करावे, अशीही सूचना नोटिसीत देण्यात आली आहे.