"लखीमपूऱच्या ताज्या घटनेवर मोदींनी भाष्य करावे", पुण्यातून काँगेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:52 PM2021-10-05T18:52:37+5:302021-10-05T18:53:20+5:30
केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक अशी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटलांची टीका
पुणे: उत्तरप्रदेशात लखीमपूरमध्ये मारले गेलेले शेतकरी आंदोलनांमधीलच होते. पंतप्रधान मोदी यांनी आता तरी मौन सोडून भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसभवनमध्ये मंगळवारी दुपारी पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी म्हणून निघाल्या. उत्तरप्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले, या घटनेचा काँग्रस निषेध करत आहे. वर्ष होत आले शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीत आंदोलन करत आहेत व मोदी त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. लखीमपूऱच्या ताज्या घटनेत एकदोन नाही तर आठ शेतकरी प्राणाला मुकले आहेत, किमान त्यावर तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांनी बोलावे अशी आमची मागणी आहे.
''केंद्र सरकार विदेशी कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालत आहेत. त्यांची आर्थिक धोरणे देशाला मारक होत आहेत. समाजाचा एकही घटक समाधानी नाही. देशातील मध्यमवर्गाची मोदी फसवणूक करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला.''
''काँग्रेसनेच नेहमीच जबाबदारीने कारभार केला. मोदी यांच्या सरकारमध्ये जबाबदारीच दिसत नाही अशी टीका पाटील यांनी केली. महाराष्ट्र काँग्रेस चांगले काम करत आहे, समाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे असा दावा पाटील यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोले यांच्या हस्ते पाटील यांचे स्वागत केले.''