पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे मित्र अदानी यांना जगातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत बनवायचे आहे, तर आम्हाला भारताला जगात पहिल्या क्रमाकांचे देश करायचे आहे. त्यांच्या व आमच्या आर्थिक संरचनेत हाच प्रमुख फरक आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे (आप) खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झालेले सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
खासदार सिंह म्हणाले, सत्तेवर येण्याआधी त्यांनी आम्ही २ कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू, असे सांगितले होते. मागील ७ वर्षांत देशात फक्त ७ लाख रोजगार निर्मिती झाली, ही त्यांनीच संसदेत दिलेली अधिकृत आकडेवारी आहे. काहीशे कोटी रुपयांची कर्जे घेऊन अनेक उद्योगपती देश सोडून फरारी झाले. त्यांची कर्जे सरकारने माफ केली. ती वसुली आता जनतेकडून विविध कर बसवून केली जात आहे. खाण्याच्या जीवनावश्यक पदार्थांवरसुद्धा मोदी सरकारने कर लावला आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिरात खासदार सिंह यांची जाहीर सभा शुक्रवारी दुपारी झाली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार, तसेच महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष राचुरे यांनी यावेळी केंद्र सरकारजवळ कसलीही नीती नसल्याची टीका केली. विजय कुंभार, महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन यांचीही यावेळी भाषणे झाली. आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असे स्पष्ट केले. मात्र, आपचे धोरण, आपचे कामकाज आपल्याला पटत असल्यानेच त्यांच्या व्यासपीठावर येत असल्याचे सांगितले.