पुणे - श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. त्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीदेहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांचे देहूत आगमन झाले आहे. देहूत मोदींचे जंगी स्वागत झाले आहे. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी देहूत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी, मोदी, फडणवीस आणि अजित पवार हे एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमान तळावर आले असता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वागतला हजर होते. अजित पवारांनी हात जोडून मोदींचे वेल कम केले. त्यावेळी, मोदींनी अजित पवार यांच्या खांद्यावर थाप मारत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. तसेच, पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट हेही हजर होते.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी वारकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली आहे. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
पुणे-मुंबई महामार्गावरील देहू फाटा ते देहू रोड फाटा ते देऊळगाव दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. वारकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी निगडी रुपीनगर तळवडे, तसेच आळंदीकडून मोशी, चिखली तळवडे मार्गे रस्ता खुला ठेवला होता. आज सकाळी १० वाजल्यापासून तळवडेपासून ते विठ्ठलवाडी पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले.