पुणे - श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित वारकरी संप्रदायास संबोधित केले. यावेळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. संतांचे अभंग हे सातत्याने आपल्यास प्रेरणा देतात, असे मोदींनी म्हटले.
जे कधीच भंग होत नाही, काळानुसार ते चालतच राहतात, आपले विचार देत राहतात. काळानुसार त्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळते ते अभंग असतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत ही संतांची भूमी आहे. उच-नीच काही नाही भगवंत अशी शिकवण संत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिली. भागवत भक्तीसाठी दिलेला त्यांनी हा मूलमंत्र राष्ट्रभक्ती आणि समाजभक्तीसाठीही लागू आहे. वारीत महिला भगिंनी मोठ्या आनंदाने सहभागी होतात, असे म्हणत देश महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी म्हटले. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ही शिकवण आपल्याला संत तुकारामांनी दिली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं, त्यांचं कल्याण हीच शिकवण आपल्याला संतांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही तुकाराम महाराजांसारख्या संतांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सावरकरांच्या तुरुंगवासातही ते संत तुकारामांचे अभंग गात होते. म्हणजे, प्रत्येक पिढीला, काळानुरुप संत तुकारामांची शिकवण प्रेरणादायी ठरल्याचं मोदींनी म्हटलं.
दरम्यान, पुढील काही दिवसांत योग दिवस येत आहे. जगभरात सध्या योग दिवस साजरा केला जातो. जगाला योग ज्यांनी दिला तो योगाही आपल्याला संतांनीच दिला, असे मोदींनी म्हटले. तसेच, योग दिवसांत आपण सर्वांनी सहभागी व्हावे, अशी इच्छाही मोदींनी वारकऱ्यांपुढे व्यक्त केली.
अजित पवारांनी केलं स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमान तळावर आले असता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वागतला हजर होते. अजित पवारांनी हात जोडून मोदींचे वेल कम केले. त्यावेळी, मोदींनी अजित पवार यांच्या खांद्यावर थाप मारत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. तसेच, पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट हेही हजर होते.