पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी पुण्यात आगमन झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत. तेथील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच इतर वाहनांसाठी पर्यायी रस्तेही देण्यात आले आहेत. परंतु या सर्व गडबडीमध्ये एका बसचालकाने पुण्यातील फक्त दुचाकी जाणाऱ्या झेड ब्रिजवर चक्क बस घातली आहे.
पुण्यात झेड ब्रिज हा फक्त दुचाकीसाठी तयार करण्यात आला आहे. यावरुन कुठलीही चारचाकी अथवा बस गेल्यास अडकून राहते. शहरच्या मध्यवर्ती भागात हा पूल आहे. त्याच्या शेजारूनच मोदींचा ताफा थोड्या वेळात जाणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहने वळवण्यास आणि रस्ते मोकळे करण्यास सुरवात झाली होती. याच गोंधळात एक बस चालकाने झेड ब्रिजवर बस घातली आहे. त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी झाली आहे.