पिंपरी : पक्षविरोधी काम केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना भरला होता. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कारवाईची धास्ती होती. निवडणुकीनंतर पवार आज शहराच्या दौऱ्यावर होते. मात्र, कारवाईबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. आपल्या मनोगतात त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सांगितली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर पवार प्रथमच शहरात आले होते. सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेचारपर्यंत ते शहरातील विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित होते. मंत्रिपद नसले, तरी त्यांचा रुबाब तसाच दिसून आला. बोलण्यातली स्टाईल मात्र काहीशी बदलल्याचे जाणवले. शब्दांची धार आणि स्वर काहीसा कमी झाल्याचे जाणवले. आलिशान मोटारीसह वाहनांच्या ताफ्यात पोलिसांच्या तीन गाड्या, शहरातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्या होत्या. प्रत्येक ठिकाणी आपला चेहरा अजितदादांना दिसावा म्हणून नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. निवडणुकीत पक्षविरोधी काम करणारे नगरसेवक, पदाधिकारी आपला चेहरा दादांना दिसावा, यासाठी धडपडत होते. तसेच काही तरी कारण काढून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. तर काहीजण तोंड लपवीत होते. दादाही त्यांच्याशी तितक्याच आपुलकीने बोलत होते. बैठक संपल्यानंतर पार्किंगमधील गाडीत बसेपर्यंत काही नगरसेवक थेट संवाद साधून आपले प्रश्न दादांना सांगत होते; तर काहीजण रांगेत उभे राहून हात जोडून नमस्कार करीत होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीविरोधी काम करणा-यांविषयी नरमाई
By admin | Published: November 17, 2014 5:10 AM