पुणे: कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतल्यानंतर अंगाला चमचे नाणी अंगाला चिकटत असल्याचा दावा नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाने केला होता. मात्र, लसीबाबत हा चमत्काराचा दावा फोल असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणलं आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर सिडकोतील शिवाजी चाैकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ देखील गोंधळात पडले असल्याचे सांगितले जात होते. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना भलताच प्रकार पुढे आला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका
व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले आणि त्यामुळे त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली तर आईला असे काही झाले नाही मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड स्टीलच्या वस्तु चिकटू लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या परिचित खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संपर्क साधला मात्र त्यांनी देखील हा अजब प्रकार असल्याचे सांगितले होते.
मात्र आता हा सर्व प्रकार फोल असल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीने म्हणलं आहे. अंनिसच्या अण्णा कडलासकर यांनी असाच प्रयोग करून अंगाला वस्तू चिकटू शकतात हे दाखवले आहे. कडलासकर यांच्यामते नाणे किंवा उलतणे हे थोडे ओले करून घेतले आणि पोट दंड पाठ यावर हलकेसे दाबले तर निर्वात पोकळी निर्माण होऊन वास्तू चिकटून राहते. पाणी सुकल्यावर मात्र ती पडते.
तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख म्हणाले ,"एकाच व्यक्तीचा बाबतीत हा प्रकार कसा झाला? कोविशिल्ड टोचणे आणि चुंबकत्व येणे याचा काही संबंध नाही. लोहचुंबकाला लोखंड म्हणजे नाणी चिकटू शकतात पण स्टेनलेस स्टील नाही. त्यामुळे हा दुसराच काही तरी प्रकार आहे. लोकांनी या गोष्टीला दैवी चमत्कार समजू नये आणि कोविशिल्डच्या बाबतीत असे गैरसमज पसरवले जाऊ शकतात.