पुणे : उडान अंतर्गत सुरू करण्यात आलेली पुणे-नाशिक (ओझर) विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. एअर डेक्कन तर्फे येत्या २१ जून रोजी हे विमान ‘उडान’ घेणार आहे. त्यामुळे पुणेकरांना एका तासात नाशिकला पोहचता येणार आहे. देशातील सामान्य नागरिकांना विमान सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी ‘उडान’ ही सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, मार्च २०१८ मध्ये ही सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. संरक्षण विभागाने पुणे विमानतळावर लॅँडिगसाठी तीन महिन्यांचीच परवानगी दिली होती. ही परवानगी संपल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा सेवा सुरू होत असून नाशिकहून सायंकाळी ६ वाजता निघणारे डीएन १९४ हे विमान पुण्यात ६.४५ वाजता पोहचेल. पुण्याहून हेच विमान ७.०५ वाजता नाशिककडे निघेल. तिथे ७.४५ मिनिटांनी पोहचेल. याबाबत वाहतूक तज्ज्ञ धैर्यशिल वंडेकर म्हणाले,‘‘ही सेवा सामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु, काही काळासाठी ती बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे-नाशिकच्या नागरिकांना कमी वेळेत ये-जा करणे सोपे जाणार आहे. पुणे-नाशिकसाठी या सेवेमुळे खूप फायदा होणार आहे. तसेच नाशिकहून आता दिल्लीला देखील येत्या १५ जून २०१८ पासून विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिक-दिल्लीकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.’’
नाशिक-पुणे उडान सेवा पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 7:12 PM
‘उडान’ ही सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, मार्च २०१८ मध्ये ही सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली.
ठळक मुद्दे२१ जूनपासून प्रारंभ : नाशिक-दिल्ली विमानसेवा शुक्रवारपासून पुणे-नाशिकच्या नागरिकांना कमी वेळेत ये-जा करणे सोपे जाणार