नसरापूर येथे गेल्या ५ मार्चपासून कोरोना रुग्णसंख्या केवळ ५३ असून या यादीत नसरापूर व्यतिरिक्त पंचक्रोशीतील गावातील रुग्णांनी नसरापूर गावचे रहिवासी म्हणून उल्लेख झाला आहे. त्यामुळे विनाकारण नसरापूर येथे रूग्णसंख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा फुगवटा झाल्याने नसरापूर गावाला प्रतिबंधित क्षेत्रात घेतल्याने येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, असे ग्रामपंचायतीच्या सनियंत्रण समितीने भोर प्रांताधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
याकरिता नसरापूर ग्रामपंचायतीने शासनाच्या आकडेवारीनुसार अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांशी संपर्क साधले असता त्यावेळी काही रूग्ण नसरापूर गावचे नसल्याचे आढळून आले आहेत,तर काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याकरिता रूग्णांच्या यादीची पडताळणी होऊन गाव प्रतिबंधित क्षेत्रातून कमी करण्यासाठी पडताळणीअंती निर्णय व्हावा, अशी विनंती प्रांताधिकारी भोर यांना करण्यात आली आहे.
चौकट :
अँटिजेन टेस्ट करताना संबंधित व्यक्ती कोणत्या गावची रहिवासी आहे याचा सबळ पुरावा तपासला पाहिजे.
- रोहिणी शेटे,
सरपंच, ग्रामपंचायत नसरापूर.