- दीपक कुलकर्णी -
पुणे : देशभरात विविध ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हे स्थळ आशिया खंडातील चर्चमधील सर्वात उंच टॉवर म्हणून ओळख प्राप्त करुन आहे. त्याठिकाणी तब्बल १ हजार किलोहून अधिक वजनाच्या आठ घंटा याठिकाणी आहेत. या ऐतिहासिक घंटांवर चार मुले एकत्रित येवून सप्तसुरांची मिलावट करत स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या वेळेला राष्ट्रगीत वाजवतात.. ते ऐतिहासिक वारसास्थळ आहे गुरुवार पेठेतील पंचहौद मिशन चर्च..रोमन कॅथोलिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या पुण्यातील गुरुवार पेठेतील 'पंचहौद मिशन चर्च ' या ऐतिहासिक वारसास्थळाला ब्रिटिश राजवटीच्या कालखंडाची किनार आहे. १८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या आठ घंटा भारतात आणल्या गेल्या. त्या मुंबईच्या व्हिटी स्टेशनवर उतरवल्यानंतर पुण्यातील सॅलिसबरी चौकातील एका कारखान्यात सर्व घंटांची पॉलिश करुन त्या गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालय या चर्चमधील टॉवरवर प्रस्थापित केल्या. या घंटावर त्याकाळापासून बायबलमधील गाणी, प्रार्थना ख्रिसमस, येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवशी, गुड फ्रायडे यांसारख्या उत्सवाला वाजविल्या जातात. तसेच इतर दिवशी दिवसाभरात तीनवेळा घंटानाद होतो. पूर्वीच्या काळी या घंटाचा आवाज काही कोसोदूर जात असत. मात्र, सध्या परिसरातील उंचच उंच इमारती, ध्वनिप्रदूषण यांच्या कचाट्यात देखील हा आवाज कमी झालेला नाही. पूर्वी दोरीच्या साहाय्याने ह्या घंटा वाजवल्या जात होत्या. आता मुलेच ही घंटा वाजवण्याचे काम करतात. विकास उमापती म्हणाले, १५ ऑ गस्ट आणि २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशी या ऐतिहासिक घंटांवर राष्ट्रगीताचे वादन करण्यात येते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागविली जाते. या आजतागायत त्यांचे महत्व जपून आहेत. त्यांच्यामधून् निनादणारे जनगणमनचे सूर नागरिकांच्या मनाचा ठाव घेतात. परंतु, पूर्वी या घंटांचे ऑपरेटिंग हे व्हीलवरुन केले जात असत. मात्र, गेल्या काहीवर्षांंपासून चार मुले टॉवरवर चढून या घंटांमधील सप्त सुरांशी जुळवाजुळव करत राष्ट्रगीताचे वादन करतात. आशिया खंडातील सर्वात उंच टॉवर म्हणून नावलौकिक असलेल्या या स्थळाची मिळतीजुळती प्रतिकात्मक प्रतिकृती आज देखील इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. विकास उमापती यांच्यासह मनोज येवलेकर, अविनाश सुर्यवंशी यांचा आठ घंटामधून राष्ट्रगीत वाजविण्याच्या उपक्रमात समावेश असतो. तसेच या सर्वजणांचे या ऐतिहासिक घंटांची देखरेख व व्यवस्थापन पाहतात.