पुणे : साखरेचे दर ग्राहकांच्या आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीमध्ये सरकारकडून शेतकरी आणि साखर उत्पादकांना दुय्यम स्थान दिले जाते. साखरेचे दर स्थिर राहत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या बाजारपेठेतील परिस्थिती भीतीदायक असून तंत्रज्ञानाच्या सहकार्याशिवाय कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पादन होणार नाही. ऊस लागवडीचा खर्च कमी होऊन उतारा वाढला, तरच साखर कारखाने स्थिर स्थावर होतील, असे मत साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. डी. जी. हापसे अॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथन, नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नागवडे म्हणाले, की ऊस उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे पुरेसे ठरणार नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांचे पाठबळ मिळाले पाहिजे. घरगुती वापरासाठी स्वस्त दरात साखर उपलब्ध व्हावी, असे कारण देऊन साखरेचे दर नियंत्रणात ठेवले जातात. प्रत्यक्षात मात्र देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण साखरेपैकी केवळ साधारणपणे २५ ते ३० टक्के साखर घरगुती कारणासाठी वापरली जाते, तर उर्वरीत ७० ते ७५ टक्के साखरेचा वापर अन्य उद्योगांसाठी केला जातो. हे अन्य उद्योजक कमी दरातील साखर खरेदी करुन अमाप नफा कमवतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या पैश्यांसाठी आंदोलने करावी लागतात, ही परिस्थिती बदलली पाहिजे. विश्वनाथन म्हणाले, की प्रती हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही स्पर्धा केवळ पारितोषिकापुरती ठिक आहे. मात्र, या स्पर्धेपेक्षा आपण शाश्वत विकासासाठी, जागतिक पातळीवर टिकण्यासाठी उत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे.
साखरेचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कसरतीत ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान : संभाजीराव कडु-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:37 PM
डॉ. डी. जी. हापसे अॅण्ड असोसिएट्स तर्फे आयोजित ऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कडु-पाटील यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देऊस पीक पद्धती आणि शाश्वत ऊस शेती उत्पादनाचे तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळाउत्पादनाशी निगडीत शाश्वत तंत्रज्ञान विकसीत केले पाहिजे : के. पी. विश्वनाथन