पुणे :विद्यापीठ अनुदान आयाेगातर्फे ‘नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क’ प्रसिद्ध करण्यात आले आहे. शालेय शिक्षणापासूनविद्यापीठीयशिक्षणापर्यंत क्रेडिट पद्धतीचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणासाठी ८ ते ३२० क्रेडिटची विभागणी केली आहे. चार वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४० क्रेडिट घ्यावे लागतील, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी २८० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. त्यामध्ये भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग, नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग, शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग आणि प्रशिक्षण महासंचालनालय या संस्थांचा समावेश हाेता.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी या फ्रेमवर्कची निर्मिती केली आहे. नियमित शिक्षणाला व्यावसायिक काैशल्य शिक्षणाची जाेड देण्यात येणार आहे. वर्गातील मूल्यमापन, प्रयाेगशाळेतील प्रात्यक्षिके, प्रकल्प, गृहपाठ यांसाठी मिळविलेल्या क्रेडिटवरून एकूण अध्ययनाचे तास माेजले जातील. वर्गातील अध्ययनाच्या पलीकडे क्रीडा, याेग, शारीरिक उपक्रम, सादरीकरण, हस्तकला आदींचा मूल्यमापनाचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रेडिट हे क्रेडिट बँकेत साठविले जातील. या क्रेडिट्सचा वापर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमांच्या पुढील प्रवेशासाठी करता येईल. ऑनलाइन, डिजिटल आणि मिश्र शिक्षणासाठीही क्रेडिट्स दिले जातील. या फ्रेमवर्कमध्ये विज्ञान, सामाजिकशास्त्र, वाणिज्य, कला यातील भेदभाव खाेडला जाईल. अभ्यासक्रम, पात्रतेला समकक्षता देऊन शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करता येईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ विद्या, ६४ कलांनाही मिळणार क्रेडिट्स
क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश असलेल्या चार वेदांसह १८ विद्या आणि ६४ कलांसाठी आता क्रेडिट्स देता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिट्स देण्याची मुभा मिळाली आहे.
शैक्षणिक पात्रता - क्रेडिट्स
नववी - १००
दहावी - १२०
अकरावी - १४०
बारावी - १६०
तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम - २२०
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम - २४०
पदव्युत्तर पदवी - २८० क्रेडिट्स
पीएचडी अभ्यासक्रम - ३२०