पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये डाॅक्टरांची अनेक आंदाेलने झाली. या आंदाेलनांचे कारण डाॅक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हाेणारे हल्ले हे हाेते. देशातील लाेकसंख्येच्या तुलनेत डाॅक्टरांची संख्या कमी आहे. एक हजार लाेकांच्या मागे एक डाॅक्टर असे प्रमाण असणे आवश्यक असताना अकरा हजार लाेकांच्या मागे एक डाॅक्टर अशी सध्याची स्थिती आहे. डाॅक्टरांचे विविध प्रश्न, त्यांच्यावर हाेणारे हल्ले या अनुशंगाने डाॅक्टर्स डे निमित्त लाेकमतने पुण्यातील काही शिकाऊ डाॅक्टरांशी संवाद साधला. त्यातून डाॅक्टरांकडे देव नाही तर माणूस म्हणून बघा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजिंक्य वेढे म्हणाला, गेल्या काही महिन्यांमध्ये डाॅक्टरांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यातून एक गाेष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे लाेक आम्हाला देव समजत आहेत. आम्ही काही देव नाही. आमच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे डाॅक्टरांना देव नाही तर माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. डाॅक्टर हे उपलब्ध गाेष्टींच्या आधारे रुग्णांवर उपचार करत असतात.
संदेश खेटमलीस म्हणाला, डाॅक्टरांकडून लाेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्राणाणिक प्रयत्न करत असताे. परंतु आमच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे डाॅक्टर रुग्णांवर उपचार करत असतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी डाॅक्टरांच्या बाजूचा देखील विचार करायला हवा. रुग्णांना चांगल्या आराेग्याच्या साेयी देण्यासाठी सरकारने आराेग्यावरील खर्च वाढविण्याची गरज आहे.
प्रवीण शेरखाने म्हणाला, पेशंटला काही झाले तर डाॅक्टरांवर अनेकदा हल्ले हाेतात. परंतु डाॅक्टर्स कुठल्या दिव्यातून जात असतात याचा विचार केला जात नाही. रुग्णांना हाताळताना अनेकदा डाॅक्टरांना देखील त्या राेगाची लागण हाेण्याची शक्यता असते. एचआयव्ही सारखे राेग देखील डाॅक्टरांना हाेऊ शकतात. त्यामुळे याचा विचार देखील हाेणे आवश्यक आहे.
श्रीकांत फटांगळे म्हणाला, डाॅक्टर हे 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण हाेत असताे. डाॅक्टरांना कामाच्या व्यापामुळे जेवणाच्या वेळा पाळता येत नसल्याने त्यांच्या आराेग्यावर विपरीत परिणाम हाेत असतात. डाॅक्टरांच्या या बाबी नागरिकांना माहित नसतात. नागरिकांनी याचा देखील विचार करायला हवा.
भाग्यश्री चाैधरी म्हणाली, डाॅक्टर हाेण्याचे शिक्षण घेण्यासाठी माेठी स्पर्धा असते. त्यातच या प्रवेशासाठी जागा मर्यादित असल्याने अधिक मेहनत करावी लागते. पेशंटच्या तुलनेत डाॅक्टरांची संख्या आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अधिक असल्याने डाॅक्टरांवर ताण येत असताे. अशातच जर पेशंटच्या नातेवाईकांकडून डाॅक्टरांना मारहाण झाली तर डाॅक्टरांचा आत्मविश्वास खचत जाताे.
साेहेल इनामदार म्हणाला, डाॅक्टरांवर सातत्याने हाेणाऱ्या हल्ल्यांमुळे डाॅक्टर कुठेतरी दुखावले गेले आहेत. इंटर्न डाॅक्टरांना मिळणारे मानधन कमी आहे. त्याचबराेबर डाॅक्टरांवर हाेणाऱ्या हल्ल्यांबाबत महाराष्ट्र विधीमंडळात ज्या पद्धतीने कायदा करण्यात आला त्याच पद्धतीचा कायदा केंद्रीय पातळीवर करण्याची देखील आवश्यकता आहे.