पुणे : चित्रपटांची रिळं, पोस्टर, छायाचित्र, पुस्तके, ध्वनिफिती असा दुर्मीळ अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. मात्र प्रभात रस्त्यावरील चित्रपट संग्रहालयाच्या मुख्य इमारतीमधील आणि कोथरूडच्या फेज टू मधील २७ वॉल्ट्सची साठवण क्षमता जवळपास संपली असल्याने संग्रहालयाच्या वतीने साठवणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तिस-या जागेचा शोध सुरू झाला आहे. संग्रहालयाने पुण्यातील बंद पडलेल्या बालचित्रवाणी आणि उटी येथील हिंदुस्थान फोटो फिल्म या जागांसंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
चित्रपटाचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारने १ फेब्रुवारी १९६४ रोजी संग्रहालयाची स्थापना केली. देशात केवळ पुण्यात असलेली ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करते. संग्रहालयाकडे चित्रपटांची रिळे, व्हिडिओ कॅसेट, डीव्हीडी, पुस्तके, पोस्टर, प्रेस क्लिपिंग, ध्वनिफिती असे १०६ वर्षांतील दुर्मीळ चित्रपट साहित्य उपलब्ध आहे. संग्रहालयाला जागा अपुरी पडू लागल्याने फिल्म इन्स्टिट्यूच्या कोथरूड येथील जागेत फेज-२ म्हणून दुसरे संग्रहालय विकसित करण्यात आले. मात्र संग्रहालयाकडे जतनासाठी देण्यात येणा-या रिळ आणि साहित्याची संख्या गेल्या तीन वर्षांत प्रचंड वाढली आहे. प्रभात रस्ता आणि कोथरूड येथील संग्रहालयाची साठवण क्षमता जवळपास संपली आहे. त्यामुळे रिळ आणि साहित्य कुठे ठेवायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. आता ही जागा देखील अपुरी पडू लागली आहे. कोथरूड परिसरातच फिल्म इन्स्टिटयूटकडून तीन एकर जागा संग्रहालयला मिळाली आहे. त्यासंबंधीचा करार पूर्ण झाला असून, येथे नवीन संकुल उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
मात्र हा प्रकल्प होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर तिस-या जागेचा शोध सुरू आहे. संग्रहालयाने राज्य सरकारच्या बंद अवस्थेतील बालचित्रवाणी आणि केंद्र सरकारच्या उटी येथील हिंदुस्थान फोटो फिल्म या जागांची पाहणी केली आहे. संग्रहालयाची आवश्यकता आणि या जागांची सद्यस्थिती, असा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आला असल्याची माहिती संग्रहालयातील खास सूत्रांनी पत्रकारांना गुरुवारी दिली. मात्र बालचित्रवाणीची सध्याची अवस्था पाहता संग्रहालय या जागेसाठी फारसे अनुकूल नसल्याचे सांगण्यात आले.