पुणे : हिंदी व मराठी रंगभूमीसह चित्रपट आणि मालिकांमध्ये सशक्त अभिनयाचे दर्शन घडविणारी चतुरस्त्र अभिनेत्री उत्तरा बावकर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. सहाय्यक अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह संगीत नाटक अकादमीचा फेलो सन्मान प्राप्त करणा-या या अभिनेत्रीच्या निधनाने कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
गेल्या दीड वर्षांपासून त्या पोटाच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. रूग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, वहिनी, भाचा, भाचेसून असा परिवार आहे. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उत्तरा बावकर या ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा' मध्ये इब्राहिम अल्काजी यांच्या तालमीत घडलेल्या अभिनेत्री होत्या. मूळच्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या या अभिनेत्रीने दिल्लीमधील रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये कामे केली. त्यामध्ये आॅथेल्लो, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक' या नाटकातही काम केले. लेखक जयवंत दळवी यांच्या ‘संध्या छाया' नाटकाचे ‘संध्या छाया' याच नावाने हिंदीत रुपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते. 1984 मध्ये त्यांना ‘हिंदी थिएटर'साठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा'ने तर 1988 मध्ये ’एक दिन अचानक' या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा'ने सन्मानित केले होते.
दिल्लीमधील ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा' मध्ये शिक्षण घेण्याबरोबरच त्यांनी अध्यापनाचेही काम केले. मराठीमध्ये ‘दोघी', ‘उत्तरायण', ‘शेवरी', ‘रेस्टॉरन्ट', ‘वास्तुपुरुष', ‘हा भारत माझा', ‘संहिता', ‘नितळ', ’बाधा' या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले.' यात्रा', एक दिन अचानक', रुकमावती की हवेली', दि बर्निंग सिझन', सरदारी बेगम', तक्षक', जिंदगी जिंदाबाद', कोरा कागज', सिन्स', हमको दिवाना कर गये',डोर', आजा नचले', 8/10 तसवीर', इक्कीस तोफोंकी सलामी', देवभूमी' आदी हिंदीतील चित्रपटामध्येही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला. ’उडान', अंतराल', तमस', नजराना', जस्सी जैसी कोई नही', कश्मकश जिंदगी की', जब लव्ह हुवा', रिश्ते' या मालिकांमध्येही त्यांनी काम केले.