पुणे : देशातील प्रत्येक राज्यात एनआयए, बीएचयु यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुरू कराव्यात, संस्कृत प्राध्यापकांसह सर्व आयुर्वेद महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसाठी कालबद्ध पदोन्नती आणि वेतनवाढ लागू करावी, प्राध्यापकांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन व इतर फायदे मिळावे आदी मागण्या आयुर्वेद टिचर्स असोसिएशनच्यावतीने आयुष मंत्रालयाला केल्या आहेत. तसेच असोसिएशनने केंद्र शासनाच्या आयुर्वेद डॉक्टरांना दिलेल्या शस्त्रक्रियांच्या मान्यतेचेही स्वागत केले.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, सचिव डॉ. मनोज चौधरी, डॉ. अर्पणा सोले, डॉ. प्रदीप जोंधळे, डॉ. नितीन वाघमारे, डॉ. पावन गुलहाने, डॉ. पवन सोनावणे आदी उपस्थित होते. सूर्यवंशी म्हणाले, प्रत्यक्षात आयुर्वेद अभ्यासात विद्यार्थ्यांना शल्य आणि शालाक्य यांच्याविषयी विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ते त्वचारोपण, डोळ्यांवरील शस्त्रक्रिया आणि रूट कॅनॉल उपचार करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या पात्र ठरतात. सुरूवातीपासूनच आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये शस्त्रकिया प्रशिक्षणासाठी शल्य आणि शालाक्य हे दोन स्वतंत्र विभाग आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे समर्थन करतो. त्याचबरोबर आयुर्वेद आणि आरोग्य क्षेत्राच्या कल्याणासाठी आणखी सकारात्मक विचार व्हावा यादृष्टीने काही महत्वाच्या मागण्याही केल्या आहेत.
शासनाने केंद्रीय नोंदणीकरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच सध्या सीसीआयएमने काढलेल्या परिपत्रकामध्ये मर्यादित ५८ शस्त्रक्रियांचा समावेश असून अन्य शस्त्रक्रिया आयुवेर्दाचे डॉक्टर्स करणार नाहीत. त्यामुळे वैद्यकशास्त्राच्या अन्य शाखांमधील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी यामुळे गोंधळ निर्माण करू नये, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
-----------