पुणे : चंद्रयान-३ यशस्वी मोहिमचे जगभरात कौतुक केले जात आहे. देशातील शास्त्रज्ञ जगातील शास्त्रज्ञ ठरले. यावर कोणी ही राजकारण नरू नये. देशात श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. यावरून वाद करण्यापेक्षा आपल्या देशातील वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याचा अभिमान बाळगळा पाहिजे असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस. एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, ‘ज्ञान की’चे संस्थापक प्रदीप लोखंडे, परिवर्तन संस्थेचे विश्वस्त शेखर वाल्हेकर,उमेश कुदळे, उदेश पवार इ. उपस्थित होते. यापुढे सामंत म्हणाले, चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा आहे. यामध्ये इस्त्रोमधील वैज्ञानिकांचे कौतुक करून रतन टाटासह अन्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांचे मोलाचे योगदान आहे.
तसेच देशात लोकशाही असल्याने राज्यात आतापर्यंत वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, नारायण राणे, शरद पवार या सारख्या अनेक मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. लोकशाहीत मुख्यमंत्री पद गेले हे स्वीकारून ते सर्व नेते विश्वास मिळविण्यासाठी पुन्हा जनतेमध्ये गेले. मात्र, काही जणांचे मुख्यमंत्री पद जावून चौदा महिने झाले तरी ते वास्तव स्विकारायला तयार नाहीत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.