मनमानी कारभाराविरोधात नाराजी : राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी
पुणे : राष्ट्र सेवा दलामध्ये राजकीय अजेंडा राबवला जाऊ नये, पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार थांबवावा, राष्ट्रीय कार्यकारिणी त्वरित बरखास्त करण्यात यावी, आणि पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा सहभागी करून घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी साने गुरुजी स्मारकात शुक्रवारी उपोषण केले. राष्ट्र सेवा दलाच्या स्थापना दिनीच संघटनेतील हा वाद समोर आला. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि विश्वस्त कपिल पाटील मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार कपिल पाटील राजकीय पक्षाशी संबंधित असूनही ते आधी सेवादलाचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. जुन्या कार्यकर्त्यांचे मानधनही बंद करण्यात आले आहे, असा आरोप सेवा दलाचे माजी राष्ट्रीय सचिव विनय सावंत आणि मिहीर थत्ते यांनी केला. संघटनेचे काम व्यक्तिनिष्ठेपेक्षा विचारांवर आणि घटनेनुसार व्हायला हवे, असे म्हणणे त्यांनी मांडले.
राष्ट्र सेवा दलाचे काम संघटनेच्या संविधानाला अनुसरून होत नसल्याचे म्हणणे कार्यकर्त्यांनी मांडले.
अनेक वर्षे संघटनेशी संबंध असलेल्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित करण्यात आलेले आरोप मागे घ्यावेत, त्यांची माफी मागावी, संघटनेतील आर्थिक उधळपट्टी थांबवावी, राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेले निर्णय रद्दबातल ठरवण्यात यावेत, अशा मागण्या उपोषणदरम्यान करण्यात आल्या.
--------
''उपोषणाला आलेल्या काही कार्यकर्त्यांविरोधात यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, तर काहींची चौकशी सुरू आहे. त्यांच्या शंकांचे निरसन सेवा दलाच्या पत्रिकेत करण्यात आले आहे. कपिल पाटील राजकीय पक्षाशी संबंधित असून ते पूर्वीपासून विश्वस्त आहेत, ही जाहीर वस्तुस्थिती आहे. कपिल पाटील आणि विनय सावंत यांनी विश्वस्त म्हणून एकत्र काम केले आहे, तेव्हा सावंत यांनी आक्षेप नोंदवला नव्हता.
- डॉ. गणेश देवी, अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल