पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२३ ची घोषणा करण्यात आली. यंदा देशातील ५० शिक्षकांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यांतील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फ महाळुंगे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिन दि. ५ सप्टेंबर राेजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रमाणपत्र, ५० हजार रुपये रोख, रजत पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन प्रणालीचा वापर करणाऱ्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून मृणाल गांजाळे यांची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत त्या २०२३-२४ च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलो मानकरी ठरल्या आहेत. राज्यस्तरीय समितीमार्फत मृणाल गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड करीत राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली हाेती. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.