पुणे : वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली.
लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे हे उमजत नाही. तसेच आवडेचे साहित्य कोठून मिळवायचे हेही माहिती नसते. वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दुवा होण्याचे काम अक्षरमित्र ही चळवळ करीत आहे. शालेय स्तरातील मुलांना उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तके, नियतकालिकेपोचवणे आणि त्यांना पडणा-या प्रश्नांना उत्तरे देणे हे या चळवळीचे उद्देश. अक्षरमित्रचे काम चालू केले त्यावेळी अमीरचे वय अवघे १९ होते. त्यावेळी तो तो मेडिकलची सीटसोडून नगरमध्ये आला होता. काय करावे हे माहिती नव्हते पण काय करायचे नाही हे त्याने पक्के केले होते. पुस्तकांच्या आवडीतून आणि सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीकडे पाहून त्याला अक्षरमित्रची कल्पना सुचली होती. पार्टटाईम म्हणून काम सुरू केले तेव्हा चुका करण्याच्या हाच आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चुका (प्रयोग) करा आणि शिका असा पवित्रा अक्षरमित्र सुरू करताना त्याने घेतला. त्यामुळे पार्टटाइम म्हणून सुरू केलेली गोष्ट फुलटाईम कधी झाली हे त्याला कळलेच नाही. आमीर ध्यास घेऊन कामाला लागला खरा. मात्र सुरुवातीला त्याला पुस्तके कोठून मिळवायची हेही ठाऊक नव्हते. पुण्यात प्रकाशन संस्था अधिक असल्याने नगरहून तो पुण्यात येऊ लागला. सुरुवातीला त्यातील गणित कळत नव्हते. प्रकाशकही फारसे दाद देईनात, तरीही त्याने चिकाटी सोडली नाही. तो शहरातील एका प्रकाशन संस्थेतून दुस-या प्रकाशन संस्थेकडे फिरत राहीला, नवीन माहिती मिळेल तिकडे धाव घेत असे. त्याच्यावर साधना साप्ताहिकाने सर्वांत पहिल्यांदा विश्वास टाकला.
हे सर्व सुरू असताना शिक्षणही चालू होतेच. असंघटितपणे काम करीत असताना तो एका अशा टप्प्यावर आलो होतो की आता अत्यंत संघटीत पद्धतीने मोठी सुरूवात करायची आहे. त्या काळात काही कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली एक संधी चालून आली. तेव्हा त्याच्या मनात काय घटले याबाबत अमीरने सांगितले की, मी जे करायला चाललो आहे. त्याचसाठी ही सुरुवात केली होती ना? आणि मग लक्षात आले की, आपल्याला पुस्तक विक्रीमधील ब्रँड व्हायचे नाहीये. शिक्षणामध्ये मूलभूत संशोधन आणि काम व्हावे आणि नोकरीसाठी, पैशांसाठी शिक्षण यावरून मुल्यांसाठी, जगण्यासाठी शिक्षण असा प्रवास व्हावा. हाच कामाचा उद्देश होता.
डॉ. अनिल सन्दोपालन, अरविंद गुप्ता, एकलव्य भोपाळसारख्या संस्था आमच्या आदर्श स्थानी होत्या. सध्या आहे तो प्रवास थांबवून एक नवा प्रवास सुरू झाला आहे. पुस्तक आणि सिनेमा यांना घेऊन काम करायचे आहे. त्यामुळे पून्हा नवीन अक्षरमित्र घेऊन येण्याचा मानस आहे. सध्या देशभर फिरतोय, लोकांमधे जाऊन राहून त्यांना समजून घेतोय, वाचतोय, जगभरातील सिनेमा सोबत आहेच. हेच आता माझं विद्यापीठ आहे. हीच शिकण्याची माझी पद्धत आहे. कुठे जाणार हे माहिती नाही ते मी ठरवतही नाही. मुक्कामापेक्षा मला प्रवास महत्त्वाचा वाटतोय, आणि त्या प्रवासाचा मी आनंद घेतोय.