श्रीकिशन काळे
पुणे : गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. पण जेवढी रोपे जगवता येतील, तेवढी मी जगविण्याचा प्रयत्न करतोय, या भावना आहेत एका तरूण वन विभागातील गार्डच्या. ३१ वर्षीय वनरक्षक रोहन दत्तात्रेय इंगवळे असे त्याचे नाव असून, तो या रोपांनी जगावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज येथील वन परिसरात तो काम करीत आहे. वन विभागातर्फे १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यात आली. परंतु, अनेक रोपे पाण्याविना जळून गेली आहेत. बरीच रोपे प्राण्यांमुळे मोडली आहेत. इंदापूर तालुक्यातील डाळज वन परिसरात गेल्या वर्षी सुमारे १४ हजार रोपे लावली. या रोपांना पाणी देण्याचे काम फॉरेस्ट गार्ड रोहन इंगवळे करीत आहेत. ते म्हणाले,‘‘सध्या पाण्याची खूप टंचाई आहे. आठवड्यातून तीन दिवस पाणी देण्यासाठी वेळ मिळतो. ’’ दरम्यान, परसवाडी वन विभागात गार्ड तानाजी रमेश पिचड आणि शिर्सफळ वन विभागात प्रतिक्षा सुभाष खोमणे देखील अशाच प्रकारची मेहनत घेत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले.
आठवड्यातून तीन दिवसच पाणी...
उजनी धरणातून जी पाइपलाइन पुढे सोलापूरकडील गावांसाठी गेली आहे, त्या पाइपलाइनला वन परिसरात चार ठिकाणी व्हॉल्व लावले आहेत. त्या व्हॉल्वमधून झाडांना पाणी दिले जाते. परंतु, आठवड्यातून तीनच दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे तीनच दिवस झाडांना पाणी द्यावे लागते. एका रोपाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिले तरी चालते. त्यामुळे तीन दिवसांत काही झाडांना पाणी दिल्यानंतर दुसºया आठवड्यात इतर झाडांना देतो. व्हॉल्वपासून दूर असणाºया झाडांना आता बाटली लावून पाणी देणार आहे. त्यासाठी बाटल्या जमा करीत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले.
पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही
डाळजला पूर्वी टॅँकरने पाणी दिले जात होते. परंतु, ते बंद झाले आहे. त्यामुळे आता आम्हालाच पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पाणी नसल्याने रोपे जळून जात आहेत. आता ४ हजारच्या जवळपास रोपे जीवंत आहेत. रोपे जळाली की वाईट वाटतं. पण पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही.
- आर. डी. इंगवळे, फॉरेस्ट गार्ड, डाळज वन विभाग