पुणे : राष्ट्रवादी पार्टीचा 20 वा स्थापना दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात पार पडत आहे. यावेळी सभेला आलेल्या प्रत्येकाला पेढ्याचे वाटप करण्यात आले. हे पेढे एका प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत देण्यात येत होते. आलेल्या कार्यकर्त्यांनी पेठे खाऊन प्लास्टिकची छोटी पिशवी फेकून दिल्याने परिसरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला प्लास्टिक बंदीचा विसर पडल्याचे दिसून आले.आज (रविवार) राष्ट्रवादीचा 20 वा स्थापना दिन तसेच पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची समारोप सभा आयोजित करण्यात आली आहे. थोड्या वेळातच शरद पवार सभेस्थळी येणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते तसेच कार्यकर्ते उपस्तिथ आहेत. सभेसाठी मोठा मंच तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा ते जाहीर बोलणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. हल्लाबोल आंदोलनाचा समारोप सभा असल्याने शरद पवार तसेच इतर नेते काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.त्याचबरोबर रविवारी सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होते. सभेच्या वेळीसुद्धा आकाशात ढग भरून आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सभा सुरु असताना पाऊस पडतो की काय अशी धाकधूक दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्लास्टिक बंदीचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 5:12 PM