मावळमध्ये राष्ट्रवादीला मनसेची रसद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 02:19 AM2019-04-06T02:19:53+5:302019-04-06T02:20:22+5:30
मनसेने लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मधुकर ठाकूर
उरण : मावळ लोकसभेच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मदतीसाठी मनसेने धाव घेतली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात असलेल्या मनसेच्या जवळपास सव्वा लाख मतांची रसद पार्थ पवार यांना मिळणार असल्याने राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनसेने लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला गाडा, उमेदवार पाडाच्या निर्णयाची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मदतीसाठी मनसेने धाव घेतली आहे. गुरु वारी कळंबोळी-पनवेल येथे मनसे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अन्य पदाधिकारी आणि मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यात बैठक झाली. बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदार संघात मनसेची जवळपास सव्वालाख मते आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शेकाप-मनसे युतीच्या लक्ष्मण जगताप यांना उरण, पनवेल, कर्जत मतदार संघातून एक लाख ९४ हजार ८०६ मते मिळाली होती. त्यापैकी ५५ ते ६० हजार मते मनसेची होती. मावळ, पिंपरी, चिंचवड या तीन विधानसभेतही मनसेची मतदार संख्या ७० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला जवळपास सहा विधानसभा मतदार संघातून सव्वालाख मते मिळतील, असा अंदाज मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी व्यक्त केला आहे. मागील उरण विधानसभेच्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना ५५ हजार मते मिळाली होती. उरणमध्ये विधानसभा निवडणुकीत मनसेने साथ सोडल्याने शेकापला ८५० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
राष्ट्रवादीचे पार्थ पवार याच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा घेण्याचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीला मनसेची रसद मिळणार असल्याने पार्थ पवारांना निवडणुकीत दिलासा आहे.