पुणे : केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान निर्यात प्रोत्साहन सप्ताह साजरा करण्यासंबंधी कळवले आहे. कृषी व औद्योगिक उत्पादनांसाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून फळ निर्यातीत लक्ष घालण्यास सांगितले आहे. सप्ताह काळात मार्गदर्शन शिबिरे, वेबिनार, प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात निर्यातक्षम मालाविषयीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. केंद्र सरकारच्या निर्यातीसाठी असलेल्या विविध योजना शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येतील. इच्छुकांनी शेतकऱ्यांची संकेतस्थळावर नोंदणी करून घेऊन नंतर त्यांचे उत्पादन तयार होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हा निर्यात केंद्रांना देण्यात आल्या आहेत. तसेच या सप्ताहात औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना तयार करणे, त्यांना योजनांची माहिती देणे याबाबत औद्योगिक विभागाला कळवण्यात आले आहे.
ग्रेपनेट या द्राक्ष निर्यातीसाठीच्या संकेतस्थळावर ४५ हजार ३९२ द्राक्ष उत्पादक जोडले गेले आहेत. ही संख्या येत्या वर्षात ६० हजार करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी या निर्यात प्रोत्साहन सप्ताहाचा उपयोग करून घेण्यास सांगण्यात आले आहे. द्राक्षाप्रमाणेच आंबा, डाळिंब, संत्रा तसेच भाजीपाल्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून सध्या ६० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या संकेतस्थळाला जोडलेले आहेत. येत्या वर्षात ही संख्या दीड लाखावर नेण्याचे उद्दिष्ट फलोत्पादन विभागाला देण्यात आले आहे.