पुणे : लैंगिकता ही निसर्गाने दिलेली देणगी असून वैद्यकीय शास्त्रानुसार ती विकृती किंवा आजारही नाही. त्यामुळे सामाजिक दबाव किंवा शास्त्रीय उपचाराने त्याच्या मूळ स्वरूपात किंवा लैंगिक आणि लिंगभाव यामध्ये बदल करता येत नाही. (भिन्न लिंगी) स्त्री-पुरुष आणि समलैंगिक यांच्याकडे आपण सामाजिक एकोप्यानेच पाहिले पाहिजे, असे मत समपथिक ट्रस्टचे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात लैंगिकता - वैज्ञानिक वास्तव आणि सामाजिक दृष्टीकोन या विषयावर बिंदुमाधव खिरे बोलत होते. यावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह निश्चय म्हात्रे, अशोक तातुगडे आदी उपस्थित होते.बिंदुमाधव खिरे म्हणाले, इंडियन सायकिट्रिक्स सोसायटी आणि जागतिक सायकिट्रिक्स सोसायटी यांनीही लैंगिकता नैसर्गिक आणि विज्ञानाच्या आधारावर असल्याचे नमूद केले आहे. पालकांच्या किंवा संगतीच्या संस्काराचा कोणताही परिणाम लिंगभाव किंवा लैंगिक कल यावर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलमांत सुधारणा केल्याने तृतीयपंथी, समलैंगिक यांना न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे संविधानातील १४, १५ व २१ या कलमांतर्गत मानवी अधिकार जपले गेले आहेत. प्रौढ आणि संमतीने झालेल्या लैंगिक संबंधास मान्यता मिळणार आहे. विनय र. र. म्हणाले, लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलणे अनेकदा असभ्य मानले जाते. लैंगिकता या विषयाबद्दल खरेखुरे आणि वास्तव ज्ञान समाजाला होण्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरेल. कायदे, रुढी, परंपरा, नियम लैंगिक अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे ठरलेत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे. कारण शिक्षा किंवा औषधाने लैंगिकता बदलता येत नाही. निश्चय म्हात्रे यांनी आभार मानले.
लैंगिकता ही नैसर्गिक देणगी : बिंदुमाधव खिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 7:04 PM
कायदे, रुढी, परंपरा, नियम लैंगिक अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे ठरलेत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे.
ठळक मुद्देपालकांच्या किंवा संगतीच्या संस्काराचा कोणताही परिणाम लिंगभाव किंवा लैंगिक कल यावर नाही३७७ कलमांत सुधारणा केल्याने तृतीयपंथी, समलैंगिक यांना न्याय