पुणे : विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्याला संतसाहित्याची ओढ लागते. कारण संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा आहे. संतसाहित्याचे मूल्यमापन खोलवर रुजले आहे. ते प्रवाही आहे. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण करून सर्वसामान्यांना अध्यात्माची वाट मोकळी करून दिली, अशी भावना पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगराध्यक्ष बबन कुराडे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, ह.भ.प. शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. वसंत आबाजी डहाके म्हणाले, ‘काळ बदलतो तशी काळानुसार स्थिती, पर्यावरण-वातावरण बदलते. आजच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय भ्रम आपल्यासमोर उभे केले जात आहेत. या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम लेखक, कवी, विचारवंत आणि सर्जनशील कलाकारांना करायचे आहे. हे काम करताना आपल्या पाठीशी काळाचे चढ-उतार पचवून मनाची शांती ज्यांनी बिघडवू दिली नाही, असा श्री ज्ञानदेवरायांसारखा भक्कम वारसा आहे, हे कायम लक्षात ठेवावे. बाजारी, उपभोगवादी व असहिष्णू बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्याचे हे काम ज्ञानदेवासारखा कवीच करू शकतो.’ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘ज्ञानेश्वरांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ अशा विचारांनी विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी धर्म, जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. त्यामुळे ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे आणि ती प्रत्येक धर्माला आपली वाटू शकते. समाजाचा विध्वंस करणारी मनातली तामसीवृत्ती नष्ट होऊन मानव प्राण्यात बंधुभाव, प्रेम व स्नेह निर्माण व्हावा व त्याने आपल्या बुद्धी कुवतीप्रमाणे सत्कार्य करावे, हा पसायदानाचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा पाया आहे.’ प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.झुगारल्याखेरीज अंतिममुक्तीचा मार्ग खुला होत नाही...भवाळकर म्हणाल्या, संतांबाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही. व्यावहारिक पातळीवर स्त्री-पुरुष हे द्वंद्व सतत प्रश्नचिन्हे निर्माण करते. झुगारल्याखेरीज अंतिममुक्तीचा मार्ग खुला होत नाही. ज्ञात-अज्ञात भयापासून मुक्ती मिळत नाही. विश्वातील द्वंद्व परमार्थक्षेत्रात मांडण्याची विशिष्ट परिभाषा आहे. स्त्री मोठ्या संतपदाला पोहोचू शकते याचे उत्तर म्हणजे संत बहिणाबाईंची चरित्रानुभवगाथा आहे. त्यांचा संघर्ष संत तुकोबारायांच्या संघर्षाशी खूप जवळचे नाते सांगतो.
संतसाहित्यामध्ये निर्मितीचा गाभा : डॉ. तारा भवाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:08 PM
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देआळंदीत पसायदान विचार साहित्य संमेलनविज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्याला संतसाहित्याची ओढसंतांबाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही