आजकाल सर्वत्र अनिश्चितता, अस्वस्थता, भविष्याची चिंता पसरलेली आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनाचे स्वास्थ्य हरवले आहे. ‘उद्या काय होणार?’ हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावत आहे. आपले मन हे आपल्या शरीराचे, शरीरातील दहाही इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये) तसेच प्रत्येक अवयवाचे अध्यक्ष आहे. मनात नसेल तर कोणतेच इंद्रिय काम करीत नाही ही वस्तुस्थिती आहे.
मनात विकार उत्पन्न झाला तर शरीरही व्याधिग्रस्त होणारच. याउलट मन जर प्रसन्न, आनंदी असेल तर शरीरदेखील निरोगी राहीलच. हीच गोष्ट संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून सांगितली आहे, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.’
आता प्रश्न असा पडतो की मन प्रसन्न ठेवण्यासाठी स्वभाव बदलण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी काही औषध प्रणाली आहे का? आणि असे औषध घेऊन स्वभाव खरंच बदलतो का? तर याचे उत्तर ‘होय’ असेच आहे.
सदर लेखमालेत आपल्या डॉ. एडवर्ड बाख ( ऊ१. ए६िं१ िइंूँ) यांनी शोधून काढलेल्या ‘पुष्पौषधी’ प्रणालीबाबत सविस्तर माहिती करून घेणार आहोत. पुष्पौषधींच्या सेवनाने मनातील नकारात्मक विचार, अस्वस्थता विरघळून जाऊन मन जरूर प्रसन्न, आनंदी व स्थिर होते असा अनुभव आहे.
तर असे हे मनावर, स्वभावावर औैषध डॉ. बाख कोण? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल, हो ना? तर डॉ. बाख हे इंग्लंडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर होते. ते टइइर, टअउर, छफउढ उत्तीर्ण होते. नंतर त्यांनी होमिओपॅथीचे शिक्षण घेतले व लंडनमध्ये व्यवसाय करीत होते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून दिला व एका निरुपद्रवी पण तितक्याच परिणामकारक अशा औैषध प्रणालीचा ध्यास घेतला. सहा-सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही फुलांपासून बनणारी औैषधप्रणाली शोधून काढली.
चला तर मग! आपण या अत्यंत नैसर्गिक, परिणामकारक अशा पुष्पौषधींची माहिती करून घेऊ या. त्यांचे परिणाम, औषध घेण्याची पद्धत, प्रत्येक फुलाचे गुणधर्म इ. सविस्तर जाणून घेऊन, त्यांचे यथायोग्य सेवन करून आपले मन प्रसन्न, आनंदी स्थिर ठेवून शरीर निरोगी ठेवू या.
क्रमश:
(वैधानिक इशारा - सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे.)
चौकट -
स्वभावाचा आरोग्यावर प्रभाव
स्वभाव हा मनातील विचारांवरच अवलंबून असतो. असे मनात विचार येतात त्याप्रमाणे स्वभाव बनून हातून कृती घडते व परिणाम अनुभवास येतात. तसेच, व्यक्ती जसा विचार करते त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या आरोग्यात फेरफार दिसून येतात.