सोमवारी ओतूर वन परिक्षेत्रातील मोठ्या आकाराच्या सांबराला एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते सांबर जखमी झाले. अनेक ठिकाणी जखमा झाल्याने त्याला हलता येत नव्हते. ही बाब महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी वनविभागाला कळविली. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएस संस्थेचे प्रतिनिधी पोहोचले. डॉ. निखिल बनगर यांनी या सांबरावर उपचार सुरू केले. तेव्हा अनेक नागरिकांनी गर्दी करून त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. गर्दीमुळे ते सांबर घाबरत होते. म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लगेच गर्दी कमी करून सांबाराला सुरक्षित केले. त्यानंतर त्यावर उपचार करण्यात आले. डॉ. बनगर म्हणाले, ‘‘हे सांबर साधारण ४ वर्षांचे होते. ते अतिशय घाबरलेले होते. तसेच जखमी असल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती. उपचार करून त्याला शांत केल्यावरच निसर्गात सोडून दिले.’’
वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके म्हणाले, ‘‘योग्यवेळी या जखमी सांबराची माहिती समजल्यामुळे त्याला मदत करता आली. योग्य वेळी त्यावर उपचार केल्याने ते पुन्हा निसर्गात मुक्तविहार करू शकले.’’