पुणे :सातारा-मुंबई महामार्गावर नऱ्हे स्मशानभूमीवरील बाजूला असलेल्या सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने एकापाठोपाठ ४८ वाहनांना उडविले. ही दुर्घटना रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सुदैवाने यात काेणताही बळी गेला नाही, मात्र दहाजण जखमी झाले आहेत. हे थरारक दृश्य पाहणाऱ्यांना काही क्षण हा ट्रक आहे की यमदूत असाच प्रश्न पडला हाेता.
या भरधाव ट्रकने पुढे असलेल्या वाहनांना एकापाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४८ हून अधिक वाहने चिरडली. त्यात प्रामुख्याने दोन रिक्षा आणि माेटारींचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रक जाऊन थांबला. या अपघातात कारमधील प्रवासी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले असून, १०८ रुग्णवाहिकेने १० जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची नेमकी संख्या रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.
मृत्यूचा स्पॉट
नवीन कात्रज बोगद्यापासून सुरू होणारा तीव्र उतार हा गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचा स्पॉट बनला आहे. आंध्र प्रदेशाचा हा ट्रक साताराकडून गुजरातकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथगतीने सुरू होती. वेगाने आलेल्या ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने सर्वप्रथम पुढे असलेल्या इनोव्हाला धडक दिली. या माेटारीने पुढच्या वाहनांना धडक दिली. पाठोपाठ हा ट्रक तसाच पुढे असलेल्या गाड्यांना धडका देण्यास सुरुवात केली. त्यात काही कार्स उलटल्या. त्यातील प्रवासी जखमी झाले. एकापाठोपाठ त्याने जवळपास ४८ वाहनांना धडक दिल्यानंतर तो एका ठिकाणी थांबला.
अपघाताची भीषणता
ट्रकने सुरुवातीला धडक दिलेल्या माेटारीचा चेंदामेदा झाला होता. त्यावरून या अपघाताची भीषणता दिसून येत होती. काही वाहने उलटली, तर काही रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस, पीएमआरडीएचे अग्निशामक दल, रेक्स्यू वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. स्थानिक लोकांनी गाड्यांमधील लोकांना बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठविले. संपूर्ण महामार्गावर एकच गोंधळ उडाला असून, संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.
ऑईल, डिझेल अन् काचांचा खच :
या वाहनांना धडक बसल्याने त्यातील ऑईल, डिझेल हे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडले असून, सर्वत्र काचांचा खच पडला आहे. पोलिस, अग्निशामक दलाचे जवान माती टाकून महामार्ग वाहतुकीस योग्य करीत आहेत.
ट्रेलरनेही नऊ वाहने उडविली
या अपघातानंतर जवळच असलेल्या स्वामीनारायण मंदिराजवळ ट्रेलरनेही नऊ वाहने उडविल्याने गोंधळात भर पडली. या अपघातात नऊ वाहनांचे नुकसान झाले असून, त्यात कोणीही जखमी नाही.
अपघातांची प्रमुख कारणे :
- तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे अशक्य.
- काही ठिकाणी सेवा रस्तेच नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरून करावा लागतो प्रवास.
- अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी उतारावरून वाहन 'न्यूट्रल' करत असल्यानेही वाहनांवरील ताबा सुटतो.
या उपाययोजनांची गरज :
- राष्ट्रीय महामार्गावरील उताराची तीव्रता कमी करणे.
- नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान अर्धवट स्थितीत असणारे सेवा रस्ते पूर्ण करणे.
- वारजे पूल ते वडगाव पुलादरम्यान सेवा रस्ता करणे.
- सर्व स्थानिक वाहतूक सेवा रस्त्यावरून होईल, याबाबत योग्य त्या उपाययोजना करणे.
अधिकारी म्हणतात, 'तीव्र' उतार नाही :
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून महामार्गावर अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून उपाययोजना केल्या, असे सांगितलं जात असले तरी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या सहा किलोमीटरच्या महामार्गावर सर्व्हे केला असता उताराचा भाग दिसून येताे. या भागातच अपघातांचे प्रमाण अधिक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या नियमांनुसार महामार्गावर पाच टक्के ग्रेडियंट असला तरी चालतो. या परिसरातील ग्रेडियंट हा साडेतीन ते चार टक्के आहे. त्यामुळे तितका उतार या भागात नाही, काही चालक उतारावर आपले वाहन 'न्यूट्रल' करतात आणि त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटते, त्यामुळे अपघात घडतात, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.