धनकवडी (पुणे) :मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. नवले ब्रीजवर झालेल्या भयंकर अपघाताने संपूर्ण पुणे शहर सुन्न झाले आहे. नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने एक, दोन नाही तर तब्बल ४८ वाहानांना चिरडले. यात चार चाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपघातासाठी धोकादायक स्पॉट मानला जाणाऱ्या नवले ब्रीजने अनुभवलेली ही घटना अत्यंत भीषण आणि धक्कादायक होती. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र रात्री ९ वाजता आणखी एक अपघात झाला. बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रेलरने सात वाहनांना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. राजेंद्र खंडेराव सांळुखे वय ४१ मांगडेवाडी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून काही वाहनचालक जखमी झाले आहेत. अपघातात सात ते आठ जण जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, मध्यरात्री नवले पुल परिसरात स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव टेम्पोने सात वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातामुळे नवले पूल परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी झाली. बाह्यवळण मार्गावरील दरी पूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे. उतारावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटनांचे सत्र कायम आहे.