पुणे : नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघाताने सर्व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. भविष्यात असे अपघात हाेऊ नयेत, यासाठीच्या उपाययोजना करण्याकरिता सर्व विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे यावेळी निश्चित केले.
या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले...
- नागरिकांचे जीव फार महत्त्वाचे आहेत. यापूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या ६ महिन्यांत येथील अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. परत अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी दूरगामी उपाययोजना करण्याची गरज आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येतील.
- पोलिस, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताची कारणे शोधून काढली आहेत. इतर कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, हेदेखील निश्चित केले आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात येईल. परत दोन दिवसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहाेत.
या उपाययाेजना आवश्यक
- मुख्य उतार कमी करण्याबाबत उपाययोजना करणे.
- स्वामी नारायण मंदिर ते दरी पुलामधील तीव्र वळण कमी करणे.
- विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रिप्स व रिफ्लेक्टर बसविणे.
- जड वाहनांची वेगमर्यादा टप्प्याटप्प्याने ताशी ४० किमीपर्यंत कमी करणे.
- सर्व्हिस रस्ता रुंद करणे, दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे.
- नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात अनाउन्समेंट करण्यासाठी ऑडिओ सिस्टीम बसविणे.
- रम्बलर स्ट्रीप दर ३०० ते ४०० मीटरच्या अंतरावर करणे, तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी त्याची देखभाल व दुरुस्ती करणे.
- स्पीड गन व कॅमेरे बोगद्यापासून थोड्या-थोड्या अंतरावर २ ते ३ ठिकाणी बसविणे.
- नऱ्हे सर्व्हिस रोड व महामार्गाला मिळणाऱ्या सर्व छोट्या रस्त्यावर रम्बलर स्ट्रीप बसविणे.
- स्ट्रीट लाइटची संख्या वाढविणे
- नागरिक महामार्गावर येणार नाहीत, त्यादृष्टीने नऱ्हे सेल्फी पाॅईंट हटवून तेथील पायऱ्या तोडणे.
- पूल सुरू होताना आणि पुलावर विविध ठिकाणी ब्लिंकर बसविणे.
- महामार्गावर लावलेले विविध प्रकारचे साईन बोर्ड हे रस्त्याच्या डाव्या बाजूला असून, ते वाहनचालकांना स्पष्ट दिसावेत, असे दर्शनी भागात लावणे.
विविध उपाययोजना करूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून काही उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त