धायरी : मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. परंतु या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी वारजे येथील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयावर शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासून मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल, असा इशारा शिवसेना नेते निलेश गिरमे यांनी दिला आहे.
मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एका अपघातात तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या महामार्गावर असलेल्या तीव्र उतारामुळे हा अपघात झाला. या उतारामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने या महामार्गावर अपघात होत आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकारी फक्त आश्वासने देत आहेत, बैठक घेत आहेत, अहवाल मागवलं आहेत परंतु अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतीकात्मक तिरडी आणि पोतराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी विजय कणसे, नीलेश पोळ, वैभव थोपटे, लोकेश राठोड, आदित्य वाघमारे, शुभम देशभ्रतार, गौरव देशभ्रतार, सार्थक जाधव, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.