पुणे :सातारा रस्त्यावरील हॉॅटेलमध्ये जेवण करून बालेवाडीकडे निघालो होतो, साडेआठच्या सुमारास आम्ही पुण्यातील नऱ्हे परिसरात स्वामी नारायण मंदिरासमोरच्या महामार्गावर होतो, त्यावेळी अचानक पाठीमागून प्रचंड आवाज आला. काही मोठा अपघात झाल्याचा अंदाज आल्याने मी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होतो तितक्यात माझ्या गाडीमागून ट्रकने जोरात धडक दिली. ती इतकी भीषण होती की माझी गाडी एखाद्या व्हिडीओ गेममध्ये दाखवावे तशी हवेत उडाली आणि सात-आठ फुट पुढे उडून पडली. नशीब बलवत्तर म्हणून गाडी पुन्हा चार चाकांवरच खाली आली.
पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्त प्रवासी विनायक शिरमे यांनी हा भयानक अनुभव ‘लोकमत’ला सांगिताला. ते म्हणाले की, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या वॅॅगनआर माेटारला जोरात धडक दिली. यात माझी गाडी हवेत उडाली आणि सात-आठ फूट लांब जाऊन् पडली. गाडी पुन्हा उभीच खाली पडल्याने आणि सीटबेल्ट बांधलेले असल्याने गाडीतील आम्हा दाेघांना जास्त मार लागला नाही. आम्ही खाली उतरेपर्यंत ट्रक पुढे आणखी काही वाहनांना उडवत लांबपर्यंत गेला होता. मागच्या सीटवर माझे बाबा बसले होते. यात त्यांच्या मानेला दुखापत झाली, मी स्वत: वाहन चालवत होतो, माझ्या पायाला दुखापत झाली.
सुमारे दहा मिनिटांमध्ये पोलिस आणि रुग्णवाहिका आल्या. त्यांनी मदत देऊ केली. तोपर्यंत माझ्या नोतवाईंकाना, कुटुंबीयांना आम्ही बोलावले होते. तेही घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने आम्ही ट्रकजवळ गेलो तेव्हा ट्रकचालक पळून गेल्याचे सांगण्यात आले.
साबणाच्या पाण्याने धुतला रस्ता :
एक किमी महामार्गावर तब्बल पंचवीस अपघातग्रस्त वाहने उलटी-सुलटी पडली. यामुळे रस्त्यावर पेट्रोल, डिझेल आणि ऑइलचे पाट वाहत होते. माेटारीचे बॉनेट, बंपर, व्हीलकव्हर यासह काचांचा खच पडला होता. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचला. त्यांनी पाण्याचा मारा करून रस्त्यावरील वाहनांचे तुकडे व काचेचा खच बाजूला केला. ऑइलमुळे रस्ता निसरडा झाला होता. पुढे आणखी अपघात होऊ नये यासाठी अग्निशामक दलाने रासायनिक साबणाचा फेस रस्त्यावर टाकून रस्ता अक्षरश: धुऊन काढला.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय या महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांची कारणे शोधण्याबाबत पुन्हा समिती नेमण्याविषयी भाष्य केले. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर आजच्या अपघातस्थळापासून वीस किमी लांब असलेल्या चांदणी चौकात वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली होती. त्यानंतर चांदणी चौकातील पूल पाडून रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेतले होते. वारंवार अपघात होणाऱ्या या रस्त्याबाबत काय कारवाई होते याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.