- किंवा -
भविष्यातील कादंबरीकारांशी मुक्त संवाद
सोशल मीडियामुळे आज ''लेखक-कवी'' अशी ओळख झटपट मिळवणं आणि मिरवणं तसं खूप सुलभ झालं आहे. मात्र हेही तितकंच खरं की, या माध्यमांमुळे अनेकांना त्यांचे रसरशीत जीवनानुभव शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली. गेली दहा-पंधरा वर्षे लेखक, कवी प्रकाशित होण्याचं संख्यात्मक प्रमाण झपाट्यानं वाढलं. यातील बहुसंख्य ''स्वयंप्रकाशित'' झाले असले तरी, अनेक नवी लिहिती नावं पुढे आली. ताज्या दमाच्या, आजचे संदर्भ, प्रश्न, घटना, प्रसंग मांडणाऱ्या रोज नव्या कथा, कविता समोर येऊ लागल्या. माझ्यासारखे नवोदितही स्वतःला आजमावून पाहू लागले. एकापरीनं हा संक्रमणाचा काळ आहे. समाज नेहमीच स्थित्यंतरातून जात असतो. त्याचे पडसाद साहित्यात उमटत असतात हे आपण जाणतोच. अशा टप्प्यावर आपल्या आधी कोणी काय काय उभारून ठेवलं आहे ते जवळून पाहणं, अनुभवणं, जाणणं महत्त्वाचं असतं.
मराठी साहित्यातलं, विशेषतः कादंबरी विश्वातलं श्री. ना. पेंडसे हे नाव त्या अर्थानं फार महत्त्वाचं आहे. एका सामान्य कारकुनाच्या रोजनिशीच्या स्वरूपात लिहिलेली ''लव्हाळी'' आणि त्यात थेट महायुद्धाचे येणारे संदर्भ, त्याचा या सामान्य कारकुनाच्या रोजच्या सामान्य जगण्याशी येणारा संबंध याचं चित्रण वाचताना किंवा ऑक्टोपससारख्या कादंबरीत संवाद आणि पत्रं अशी मांडणी करत केलेला प्रयोग अनुभवताना, गारंबीच्या बापू आणि राधाची गोष्ट वाचताना काय किंवा कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक अशा सर्व धाग्यांची कसबी कारागिरीने गुंफण करून विणलेले ''तुंबाडचे खोत'' हे द्विखंडात्मक महा-शब्दवस्त्रच ज्यात प्रेम, लोभ, राग, माया, स्वार्थ, सूड, लंपटपणा, मुरब्बीपणा, बेरकी वृत्ती, धडाडी, जिद्ध, ऋषीतुल्यता, देशप्रेम, त्याग, बलिदान अशी बहुतेक सर्व मानवी स्वभावविशेष खुबीने ओवली आहेत. हे सगळं वाचताना थरारून जायला होतं. हे असं का होतं? याचा कुतूहल म्हणून शोध घेतल्यावर त्यांच्याच ''रथचक्र'' या कादंबरीच्या प्रस्तावनेतून आणि विशेषतः त्यांच्या ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या विस्तृत आत्मचरित्रातून याचं उत्तर सापडतं.
रथचक्रच्या प्रस्तावनेत ते म्हणतात की,
"समाजाला काही शिकवण्याकरिता, संदेश देण्याकरिता मी लिहीत नसून मला जाणवलेल्या अनुभूतीला आकार देण्याचा मी प्रयत्न करत आहे."
"मला जे जाणवतं ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे? का? जीवनाचा किती खोलवर मी ठाव घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे? का? मी माणसं निर्माण करतो की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचं संरक्षण काय करणार?” ही दोन्ही विधानं या कादंबरीच्या दुसऱ्या आणि चौथ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील आहेत हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.
पेंडसे यांनी उद्याच्या कादंबरीकारांशी साधलेला एक मुक्त संवाद (मॅजेस्टिक प्रकाशन) मुळातून वाचण्याजोगा आहे. यात लेखक आणि सामान्य माणूस एखाद्या घटनेकडे कसं पाहतो इथपासून ते कादंबरीचं व्याकरण, व्यक्तिरेखेचं मर्मस्थान, निर्लेपदृष्टी, वास्तवाचं भान, साधना, शैली, प्रादेशिकतेचं भान, कारागिरी, लेखकाची वाढ, वाचन, समीक्षा अशा अनेक मुद्द्यांचं विस्तृत विवेचन केलं आहे. हे विवेचन अनुभवसिद्ध आहे.
कथा, कविता, ललितलेखन, प्रासंगिक, वैचारिक अशा सर्व प्रकारच्या लेखनात हे असे नवे वारे वाहत असताना वयानं वृद्ध झालेले किंवा शरीराने कालवश झालेले लेखक, कवी आणि त्यांच्या साहित्यकृतींबद्दल नव्याने चर्चा घडते आहे. अशी घुसळण फार महत्त्वाची असते. कारणपरत्वे अनेकदा ज्या वाटेवरून आपण चाललो आहोत त्यावर पूर्वी उमटलेल्या पाऊलखुणांची आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अशा वेळी अशा चर्चा, उजळणी आवश्यक ठरते.
अक्षय प्रभाकर वाटवे
(लेखक)