रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथे क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण, रशियन सैन्याच्या हल्ल्यात आज एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमावाला लागला आहे. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. आता, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
युक्रेनच्या खार्किव येथे सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो २१ वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतीय पालकांची काळजी वाढली असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनीही केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.
'माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की, प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही', असे सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, राजकीय नेत्यांच्या विधानावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांचे जीव धोक्यात असताना हे लोक अशी असंवेदनशील, बेजबाबदार आणि निष्ठूर विधाने करीत आहेत, हे खेदजनक आहे, असेही त्यांनी म्हटलंय.
युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. शरद पवार यांनी काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन देखील केला होता. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. दुर्दैवाने आपण आज भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत. ही घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, कृपया कृती करा. परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ट्विट करुन केद्र सरकारला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिलाय. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखापुरा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. अद्यापही रशियात हजारो आपले भारतीय विद्यार्थी अडकले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत. काहींना जेवणही मिळेना झालंय. केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावं, युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता गतीमान प्रकिया रावबली पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, असेही पवार म्हणाले.