पुणे : गणेशोत्सवानंतर भक्तांना वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. नऊ दिवस रंगणा-या नवरात्रोत्सवासाठी शहरातील देवीची मंदिरे विद्युत रोषणाई, सजावट, रंगरंगोटीने सज्ज झाली आहेत. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी (दि.26) विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सकाळी घटस्थापना होणार असून, दिवसभर भजन-कीर्तन, प्रवचने, आदी धार्मिक कार्यक्रम रंगणार आहेत. देवीची मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार असून, उत्सवाच्या दहा दिवस मंदिरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
चतु:शृंगी मंदिर देवस्थान
विविध धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. उत्सवामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले राहणार असून, यानिमित्ताने गणपती मंदिरात रोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसूक्त पठण, वेदपठण आयोजिले आहेत. ऑनलाइन-ऑफलाईन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे. सोमवारी (दि.26) सकाळी नऊ वाजता घटस्थापना होईल. रोज सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होईल. मंगळवारी (दि.4) दुपारी 2.30 ते 5.30 नवचंडी होम होणार आहे. तसेच, विजयादशमीनिमित्त बुधवारी (दि. 5) सायंकाळी 5 वाजल्यापासून सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून निघेल. त्यात बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे यानिमित्ताने हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केले जाणार आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सोमवारी (दि.26) सकाळी साडेसहा वाजता घटस्थापना होणार आहे. अभिषेक झाल्यावर घटस्थापना होईल. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी साडेसहा ते रात्री साडेबारा खुले राहणार असून, मंदिरांत खास सजावटही करण्यात आली आहे.
तळजाई माता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर)
मंदिरात अभिषेक, आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम उत्सव काळात होतील. सोमवारी (दि. 26) सकाळी 10 वाजता विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. रोज सकाळी 7 वाजता अभिषेक होणार आहे. दिवसभर पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. महिला याठिकाणी श्री सूक्त पठण देखील करणार आहेत.
श्री महालक्ष्मी मंदिर (सारसबाग)
मंदिराच्या वतीने दहाही दिवस धार्मिक कार्यक्रमांसह देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि.26) सकाळी 9 ते 11.30 या वेळेत अॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी 6.30 वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होईल. नऊ दिवसांत वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतील.
वनदेवी मंदिर (कर्वेनगर)
सोमवारी (दि.26) सकाळी नऊ वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमही होतील. भाविकांना मंदिर 24 तास दर्शनसाठी खुले राहील. रोज सायंकाळी सात वाजता देवीची आरती होणार असून, दरवर्षीप्रमाणे देवीची भव्य मिरवणूकही निघणार आहे. यामध्ये घोडे, उंट , बँड पथकांचा समावेश असेल.
श्री काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
सोमवारी (दि.26) सकाळी नऊ वाजता उदय भिडे आणि भिडे कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. उत्सव काळात कीर्तन, श्रीसूक्त पठण, महिला भजनी मंडळाचे कीर्तन, नवचंडी याग असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रोज रात्री नऊ वाजता सनई-चौघड्याचे वादन होईल.
पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)
सोमवारी (दि.26) मंदिरांत विधिवत पद्धतीने सकाळी 9 वाजता घटस्थापना होईल. नवरात्रोत्सवात सकाळी भजन-कीर्तन, श्री सूक्त पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.