पुणे : पहिला घटस्फोट झाला नसतानाही गुपचूप दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या नवरोबाला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पतीने आपले पहिल्या पत्नीबरोबर लग्नच झाले नसल्याचा बचाव न्यायालयात केला होता.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद्याकर जोंधळे यांनी हा निकाल दिला आहे. दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी दोघांनी संमतीने दावा दाखल केला होता. या दोघांचा नोव्हेबर २००१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्याने पतीने पत्नीला विविध कारणावरुन त्रास देण्यास सुरुवात केली. वाद मिटत नसल्याने त्यांनी एप्रिल २००५ मध्ये कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. मात्र, या दाव्याचा निकाल होण्यापूर्वीच पतीने जुलै २००५ मध्ये दुसऱ्या तरुणीबरोबर विवाह केला. पहिली पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न केल्याने पती व दुसऱ्या पत्नीविरुद्ध पहिल्या पत्नीने अॅड. मानसी जोशी यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदार खटला दाखल केला. तसेच आपण कायदेशीर पत्नी असून आपल्याला पोटगी मिळावी असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिले होते.
दुस-या पत्नीशी आपण त्याअगोदरच १९९९ मध्ये लग्न केले असल्याचा दावा करून पतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, त्याचे योग्य कायदेशीर पुरावे पतीला सादर करता आले नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली तारीख ही लग्नाच्या तारखेबाबतचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढून पतीला शिक्षा सुनावली.