पुणे : कोरोनामुळे देशभरात गेल्या एक वर्षाहून अधिक काळ लॉकडाऊन आहे. त्यामुळे सातत्याने एकमेकांबरोबर राहिल्याने कौटुंबिक कलहाच्या तक्रारी वाढल्या. त्यातच जवळच्या नातेवाइकांचा हस्तक्षेप वाढल्याने काही प्रकरणे अधिक ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहोचत आहे. महिलांबरोबर आता पुरुषांकडूनही पत्नीविरोधात छळाच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे येत आहे. गेल्या दीड वर्षात महिलांकडून २ हजार १२ तक्रारी आल्या आहेत. पुरुषांकडूनही १ हजार ५७ तक्रारी झाल्या आहेत.
एरवी बहुतांश पुरुष हे अधिक काळ घराबाहेर असतात. त्यामुळे घरातील बारीकसारीक गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत. लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायको दोघेही घरात राहिल्याने एकमेकांच्या गोष्टीत त्यांची दखलअंदाजी वाढली. परिणामी घरातील कुरबुरीही वाढल्या.
चौकट
भांडणामागील ही आहेत कारणे
पत्नी व तिच्या माहेरकडील लोकांचा संसारात होणारा हस्तक्षेप हे पती-पत्नीमधील भांडणाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण बनले आहे. त्यापाठोपाठ पत्नी रागावून माहेरी निघून गेली आहे. तिने नांदायला यावे यासंबंधीचे तक्रार अर्ज मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळेच पुरुषांच्या तक्रार अर्जांची संख्या जास्त वाढल्याचे दिसून येते. त्याबरोबर पती व पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद वाढले आहेत.
चौकट
तक्रारी वाढल्या
२०१९ मध्ये असलेल्या तक्रारींपेक्षा २०२० मध्ये पुरुषांकडून आलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आता २०२० मधील तक्रारींपेक्षा अधिक तक्रारी २०२१ मध्ये येताना दिसत आहेत. सन २०१९ मध्ये ६९५ पुरुषांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात २०२० मध्ये सुमारे शंभरने वाढ झाल्याचे दिसून येते. महिलांच्या तक्रारीत थोडी घट झाल्याचे दिसते.
चौकट
भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारी
वर्ष एकूण तक्रारीमहिलापुरुष
२०२० २०७४ १२८३ ७९१
२०२१ ९९५ ७२९ २६६
चौकट
“सध्या भरोसा सेलकडे येणाऱ्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्यात पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारात होणारा हस्तक्षेप, पत्नीने नांदायला यावे यासंबंधीचे तक्रार अर्ज अधिक असतात.”
-सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.